Tuesday, 12 February 2013

ग्रामीण व शहरी वर्तमानपत्रांतील राजकिय बातमी : एक अध्ययन



ग्रामीण व शहरी वर्तमानपत्रांतील राजकीय बातमी : एक अध्ययन



मुंबई विद्यापीठाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता या पदव्युतर अभ्यासक्रम पूर्ततेसाठी शोधनिबंध प्रस्तुत केला आहे.
शैक्षणिक वर्षः२००९-२०११ साठी सादर.

                               

         आमचे विभागप्रमुख प्रा.मंगेश करंदीकर यांच्या विशेष मार्गदर्शनाबद्दल मी त्यांचा  आभारी आहे.  संशोधन मार्गदर्शक म्हणून प्रा. स्नेहा सुभेदार यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे हा शोधनिबंध पूर्णत्वास जाऊ शकला. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. विभागातील प्रा. संजय रानडे यांनी संशोधन करण्यास विषय सुचविला व मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचादेखील मी विशेषत्वाने ऋणी आहे.  डॉ. प्रा.सुंदर राजदीप यांनी वेळोवेळी केलेल्या सूचनांमुळे संशोधन कालावधीत पूर्ण होऊ शकले त्यामुळे त्यांचे देखील आभार.      

            संशोधनादरम्यान मदत करणारे  पत्रकार कुमार केतकर, भारतकुमार राऊत, प्रकाश पोहरे, बबन कांबळे, गिरीश कुबेर,राजीव खांडेकर, दिनकर रायकर, अभय टिळक यांचा देखील मी आभारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रा.डॉ.श्रीराम निकम यांनी केलेल्या सहकार्याबद्दल तसेच संशोधना दरम्यान मदत करणा-या सहकारी मित्रांचा देखील मी आभारी आहे.










अनुक्रमाणिका

प्रकरण १ : प्रस्तावना………………………………..०७
प्रकरण २ :साहित्याचे पुनरावलोकन...........................१३
प्रकरण ३ :संशोधनाची रचना ..................................२७
३.१संशोधनाचा दृष्टीकोण :
३.२ संशोधन प्रश्न:
३.३ संशोधनाचा उद्देश्य:
. संशोधनाची उपयुक्तता:
३.५ गृहितकृत्यः
३.६ संशोधनाची समस्या :
३.७ संशोधन पद्धतः
३.८ संशोधन पद्धतीः
३.९ आशय विश्लेषण :
३.१० माहिती एकत्रित करावयाची साधनेः
३.११नमुना निवड पद्धत :
३.१२ संशोधन प्रश्नावलीः
३.१३ मुलाखतींचा आढावाः
३.१४ माहिती एकत्रित करण्यासाठी वापरलेली पद्धतः
३.१५ संशोधनाच्या मर्यादाः
३.१६ संशोधनाचे ध्येयः
३.१७ तथ्याचे वर्णनः
प्रकरण ४ :तथ्यांचे निरीक्षण....................................४७
प्रकरण ५ :निष्कर्ष ...............................................४९
प्रकरण ६:भविष्यातील संशोधनासाठी संधी.................५१
मुलाखत प्रश्नावली-
संदर्भसूची.....................................................................६२
















संशोधका विषयी

सं‍शोधक हा स्वत: ग्रामीण भागात राहिला व शिकलेला आहे. त्यामुळे संशोधकाने ग्रामीण परिसर व त्या परिसरातील वर्तमानपत्र व्यवस्थेचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे संशोधकाने ‘ग्रामीण व शहरी वर्तमानपत्रांतील राजकीय बातम्यांचे अध्ययन’ या आशयाचा विषय संशोधनासाठी निवडलेला आहे. मुंबई विद्यापीठातील संज्ञापन आणि पत्रकारिता विभागातील पदव्युत्तर अभ्यासक्रमात तिस-या सत्रात उत्तीर्ण झाल्यावर चौथ्या सत्रात संशोधन हा विषय ठेवण्यात आलेला आहे. संशोधन करीत असतांना विद्यार्थ्यांच्या अंगी ख-या अर्थाने पत्रकारिता मुरते. त्यांची विचार करण्याची क्षमता वाढते,  असा अभ्यास निर्मिती मंडळाचा मानस आहे. संशोधन करतेवेळी संशोधकाला ख-या अर्थाने याची प्रचिती आली.  अभ्यासक्रमाचा भाग असल्यामुळे संशोधकाने वरील विषय निवडलेला आहे.




प्रकरण क्रमांक-१



प्रस्तावना –
वर्तमानपत्रांमधील संपादकांचा बातमीच्या वृत्तांकनावर प्रभाव पडतो का ? वर्तमानपत्रे राजकीय बातम्यांना प्राधान्य का देतात ? सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून की वाचकांची मागणी असते म्हणून ? असे प्रश्न संशोधनकर्त्यासमोर निर्माण झालेले आहेत. सदर प्रश्नांची उकल करण्याकरिता संशोधनकर्त्याने संशोधनासाठी ग्रामीण व शहरी वर्तमानपत्रांतील राजकीय बातमी : एक अभ्यास’  हा विषय  निवडलेला आहे . स्वातंत्र्यपूर्व काळात वर्तमानपत्रे स्वातंत्र्य लढ्याचे, राष्ट्रीय भावनेच्या जागृतीचे, साम्राज्यवाद आणि दहशतवादा विरुध्दचे हत्यार म्हणून उदयास आली. ब्रिटीश साम्राज्य सत्तेच्या अन्यायी धोरणाविरुध्द वर्तमानापत्राद्वारे प्रचार करणे,  समाजामध्ये स्वातंत्र्याची जाणीव रुजवणे, आणि स्वातंत्र्यानंतर देशाचे उज्ज्वल भविष्य वाचकांपुढे मांडणे यासाठी पत्रकारांचा फ़ार मोठा वर्ग या व्यवसायात कार्यरत होता. देशातील बहुतेक  वर्तमानपत्रांचा उद्देश हा देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळवून देणे हाच होता. देशात वर्तमानपत्रे बहुतेक भागांत पोहोचले होते. म्हणूनच स्वातंत्र्य चळवळीत विचारांच्या प्रसाराचे प्रभावी माध्यम म्हणून वृत्तपत्रांचा वापर केला गेला.
स्वातंत्र्यानंतर लोकशाही राज्यघटनेच्या प्रकाशात पत्रकारितेचे नवे पर्व सुरु झाले. सार्वत्रिक निवडणूका आणि पंचवार्षिक योजना  संपादकांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी होत्या. स्वातंत्र्यप्राप्ती नंतर वृत्तपत्रांचे धोरण, आर्थिक हितसंबंध, राजकीय उद्दिष्ट आणि सामाजिक दृष्टीकोन यांत अमूलाग्र बदल झाला. त्याच बरोबर देशात मुंबई, दिल्ली, कोलकत्ता. चेन्नई यांसारखी शहरे देशाची आर्थिक , राजकीय  ओळख बनली.
ब्रिटिशांच्या भारतात येण्याने पत्रकारितेच्या स्वरुपात देखील बदल झालेत.  भारतातील पहिले वर्तमानपत्र 'बंगाल गॅझेट'  हे सेरम्पोर येथून जानेवारी २९, १७८९ रोजी प्रकाशित झाले. या वर्तमानपत्राचा  संपादक होता जेम्स ऑगस्टस हिकी. [1] वर्तमान पत्रांच्या प्रसारासाठी काही गोष्टी आवश्यक असतात - साक्षरता, छपाई तंत्रज्ञान, वर्तमानपत्रे विकत घेण्याची क्षमता आणि सामाजिक आणि राजकीय जागृकता.[2] ब्रिटिशांच्या विविध धोरणांमुळे आणि भारतातील स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीवर हे सगळे काही भारतात आले आणि आधुनिक पत्रकारिता देशाच्या प्रमुख शहरांतून गावागावात पसरली.[3] भारतातील सांस्कृतिक, वैचारिक, भावनिक वैविध्य अफाट आहे.
त्याबरोबर आर्थिक, राजकीय आणि सामाजिक वैविध्यही आहेच. यामुळे भारतातील पत्रकारितेला नेहमीच एक विशिष्ट प्रादेशिक रंग असे. तसा तो आजही आहे. याबरोबरच आता व्यावसायिक दृष्टिकोनामुळे स्थानिक वाचकांचा सामाजिक आणि राजकीय कौल लक्षात घेऊन संपादकीय धोरण ठरवले जाते. उदाहरणार्थ एकच वर्तमानपत्र जे नागपुरात प्रकाशित होते आणि मुंबईतही प्रकाशित होते त्याचा 'स्वतंत्र विदर्भ' याबाबतचे संपादकीय धोरण वेगळे असू शकते. एखादे वर्तमानपत्र मुंबईत प्रकाशित होते  आणि त्याचबरोबर कोलकाता, चेन्नई आणि अहमदाबाद येथून प्रकाशित होते. अशा वर्तमानपत्राचा  संपादकीय दृष्टिकोन आणि बातम्यांच्या मांडणीत आणि रचनात्मकदृष्ट्या केलेला फरक हा बहुतांशी प्रादेशिकतेमुळे असतो.
वर्तमानपत्रांत होणाऱ्या राजकीय बातम्यांचे वार्तांकन बघितले असता देशातील राजकीय संस्थानांची आणि प्रसार माध्यमांची केंद्रे (मुख्यालये) ही शहरांमध्ये आहेत. तर राजकीय घटनांची वारंवारता ग्रामीण भागात अधिक आहे असे संशोधनकर्त्यास वाटते. इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रामध्ये देखिल प्रचंड विविधता व विरोधाभास आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंतांपैकी एक असणारा उद्योजक याच राज्यात राहतो अणि कर्ज न चुकवता आल्याने कित्येक शेतकरी याच राज्यात आत्महत्या करतात. महाराष्ट्रातील पत्रकारिता या विषयाचा आढावा घेताना याचे दोन प्रकार सहज दिसतात. एक म्हणजे शहरी भागातील पत्रकारिता आणि दुसरा ग्रामीण भागातील पत्रकारिता. अर्थात शहरी व ग्रामीण भागांचे  राजकारणाचे आणि समाजकारणाचे प्रश्न वेगवेगळे आहेत. महाराष्ट्रातील पत्रकारिता ही कायम प्रभावी राहिली आहे ,मात्र फक्त एका मर्यादेपर्यंतच.
स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एक चळवळ म्हणून सुरू झालेल्या पत्रकारितेकडे सध्या एक धंदा' याच दृष्टीने बघितले जाते. महाराष्ट्रात पहिले वृत्तपत्र दर्पण’ सुरू करण्याचा मान जातो तो  बाळशास्त्री जांभेकर यांना. मात्र पत्रकारितेची तत्त्वे रुजवायचे आणि जोपासायचे काम मात्र केले लोकमान्य टिळकांनी. भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ब्रिटिश सरकारनं ज्यांचा धसका घेतला होता ते लोकमान्य टिळक. त्यांनी मराठी तसेच इंग्रजी वृत्तपत्रांना दिशा दाखवण्याचे काम केले. केसरीच्या पहिल्याच संपादकीय लेखामध्ये त्यांनी वृत्तपत्राला  रात्रकालीन पहारेकरी म्हटले आणि केसरीची तत्त्वेदेखील लिहिली. जनमताचे दडपण अधिकारी वर्गावर निर्माण करून त्यांच्याकडून जनहिताचे कार्य करवून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे हे वृत्तपत्राचे प्रमुख कार्य असे देखील त्यांनी नमूद केले आहे.
मराठा हे उच्चशिक्षित समाजाकरता प्रसिद्ध होणारे इंग्रजी वृत्तपत्र होते. अभिजनांचे जनमत भारतीय स्वातंत्र्याकरता तयार व्हावे, म्हणून या वृत्तपत्राचे प्रकाशन केले जाई. १८९६-९७ च्या भीषण दुष्काळाचे केसरी व मराठाने तपशीलवार वर्णन करून सामान्यांचे प्रश्न प्रसिद्ध केले. परकीयांच्या हातांत सत्ता असल्याने आपणच आपल्या माणसांना मदत करू शकत नाही हे देखील टिळकांनी लोकांच्या गळी उतरवले. ही झुंजार पत्रकारितेची परंपरा चिपळूणकर बंधू, आगरकर, विठ्ठल रामजी शिंदे, लोकहितवादी, बापूजी अणे, माडखोलकर, शिवराम परांजपे, न. चिं. केळकर, कोल्हटकर ,मामा वरेरकर, भोपटकर, अनंत गद्रे, खाडिलकर, परुळेकर इत्यादींनी पुढे नेली.[4] ही सर्व मंडळी आपापल्यापरीने स्वदेश, समाजजागृती, सामाजिक सुधारणा यांकरता वृत्तपत्राच्या माध्यमातून कार्यरत होती.
पुरोगामी विचारांचा संदेश घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात एक लोकविलक्षण क्रांती घडवली. आंबेडकरांच्या लेखणीने उपेक्षित, पददलित, विस्थापित सामान्यजनांचे दु:ख मूकनायक, बहिष्कृत भारत आणि समता यांसारख्या नियतकालिकांतून मांडले. आंबेडकरांच्या पत्रकारितेमध्ये लक्षणीय मुद्दा असा होता, की बाबासाहेबांनी ज्या बहुजन समाजाच्या वतीने लढा उभारला, ती उपेक्षित जनता शिक्षणापासून वंचित होती. त्यामुळे वृत्तपत्र या माध्यमाचा त्यांना काहीच उपयोग नव्हता. तरीदेखील बाबासाहेबांनी पत्रकारिता हे प्रमुख अस्त्र वापरले ते शिक्षित असलेल्या, प्रस्थापित सवर्ण समाजाचे मतपरिवर्तन करण्यासाठी. त्यात बाबासाहेब यशस्वी झाले, यात शंकाच नाही.[5] शहरी भागातील वृत्तपत्रलेखकांना ग्रामीण प्रश्नांची जाणीव नसते त्यामुळे स्थानिक पातळीवरील मोठयात मोठा प्रश्नदेखील राष्ट्रीय स्तरावर पोहोचू शकत नाही.[6] महाराष्ट्रातील ग्रामीण पत्रकारिता या विषयाकडे बघितल्यास सर्वत्र निराशेचाच दृष्टिकोन दिसून येईल. सध्या छपाईमध्ये आलेल्या नवनवीन तंत्रज्ञान आणि सुविधांमुळे वृत्तपत्र सुरु करणे फारसे कठीण राहिलेले नाही. त्यामुळे अगदी तालुकास्तरावरही वृत्तपत्र निघते आणि अशा वृत्तपत्रांचे साधारण स्वरूप ठरलेले असते. पहिल्या पानावरची पहिली बातमी ही गावातील राजकीय गोंधळाची असून दुसरी बातमी ही एखाद्या गुन्ह्याची चटकदार बातमी               (बलात्कार, खून, आत्महत्या ) असते. दुसर्‍या पानावरील संपादकीय हे इतरच भलत्या विषयांवरचे असते. जिल्हा माहिती कार्यालयातून मिळणारे प्रसिद्धी पत्रके, भविष्य, कोडी, सुगरणीची करामत असे विषय असतात. तिसर्‍या पानावर गावातील सत्कार समारंभ, त्यांतले फोटो, भाषणे इत्यादी मजकूर,  चौथ्या पानावर पान एक वरून पुढे चालू  आणि क्रीडा , कधीतरी मध्येच गावातील प्रतिष्ठितांचे लेख आणि त्यांचे विचार अशा धाटणीची वृत्तपत्रे मोठयाप्रमाणात आपणास पहावयास मिळतात. अर्थात यामध्ये कुठेही विकासात्मक बातमी किंवा त्या गावातील लोकांना मार्गदर्शक ठरू शकेल, असे काही मुद्दे अर्थातच नसतात. चावडीवर बसून गप्पा मारायच्या लायकीचा हा मजकूर असतो. मोठी वृत्तपत्रे जी जिल्हाविशेष पुरवणी काढतात त्या पुरवण्यांचे चित्रदेखील असेच असते. या सर्वांमध्ये कुठेही महिला सक्षमीकरण, साक्षरता प्रसार, शेतीमधील सुधार यांवर काहीही लिहिलेले नसते.  शहरी पत्रकारांमध्ये शक्यतो बीट असतात. बीट म्हणजे एखाद्या पत्रकाराच्या कामाच्या विषयाचे स्वरूप अणि व्याप्ती.[7] यांमध्ये राजकारण, अर्थशास्त्र, उद्योग, माहिती-तंत्रज्ञान, कायदा, चित्रपट, नाटक, क्रीडा असे अनेक विषय असतात. त्यामुळे हे पत्रकार त्या-त्या विषयातले पारंगत असतात. बातमीच्या पलीकडे जाऊन माहिती आणणे, इतर वृत्तपत्रांपेक्षा वेगळा विषय मांडणे हे शहरी पत्रकारांमध्ये अपेक्षित असते. मात्र ग्रामीण पत्रकारांमध्ये बीट नसतात. गावातील सर्वच बातम्यांचे वार्तांकन करतात. रोजच्या बातम्यांचा रतीब घालणे, इतकेच त्यांचे काम असल्याने त्यांना त्या बातमीबद्दल जास्त विचार करणे, विश्लेषण करणे अर्थातच जमत नाही. त्यामुळे सणसणीत, भडक बातम्या शोधणे हेच त्यांचे काम बनून जाते, कारण त्यांच्या वाचकांचीसुद्धा तीच आवड असते. ग्रामीण भागामध्ये एका प्रकारची संकुचित वृत्ती तयार करायचे काम स्थानिक वृत्तपत्रे करत आहेत असे म्हटल्यास वावगे ठरत नाही. अर्थात राज्यस्तरावरील वृत्तपत्रेदेखील काही भरीव कामे करत आहेत असे नाही. कित्येकदा राज्यस्तरावरच्या वृत्तपत्रांना मुंबई-पुण्यापलीकडे देखील महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्राचे विविध प्रश्न ,मुद्दे आहेत याची जाणीवच नसते.  ग्रामीण महाराष्ट्रात स्थानिक प्रश्न समजून घेणार्‍या पत्रकारांची वानवा आहे.
ग्रामीण वाचकांना उत्तम दर्जाची वृत्तपत्रे मिळाल्यास विकासामध्ये त्यांचा सहभागदेखील वाढेल . देशदूत, गावकरी, पुढारी, एकमत, देशोन्नती किंवा तरूण भारत, पनवेल टाईम्स, रामप्रहर,निर्भीड लेख,किल्ले रायगड यांसारखी वृत्तपत्रे ग्रामीण  भागात लोकप्रिय आहेत. या वृत्तपत्रांची स्थानिक पुरवणी ही बर्‍याचदा गावातल्या बातम्यांची असते. ग्रामीण भागात लोकांना बाकीच्या वृत्तपत्रामध्ये कमी आणि ही स्थानिक पुरवणी वाचण्यात जास्त रुची असते. वाढते उद्योगधंदे ,त्यामुळे होणारे जमिनीचे अधिग्रहण , शेतीसारख्या पारंपरिक उद्योगांमध्ये होणारा तोटा या सर्वांबद्दल ग्रामीण जनतेला माहिती देणं, वाढत्या समस्यांची उत्तरे शोधण्यामध्ये सहाय्य करणे हे ग्रामीण पत्रकारितेचे प्रमुख स्वरूप ठरायला हवे.[8] दुर्दैवाने हे आज होताना दिसत नाही .

प्रकरण क्रमांक-२


साहित्यावलोकन-
                             राजकीय प्रक्रियांदरम्यान राजकारणी नेते भाषणे देतात,प्रस्ताव मांडतात व अशी अशी काही कृत्ये करतात जेणे करुन त्या निषेध /विरोध प्रक्रियेला गती प्राप्त होते.अधिकाधीक जनसमुदायांचात त्यात सहभाग वाढतो. ज्यात माध्यमांची भूमिका फार महत्वाची असते.
राजकीय घटना व त्या बातम्यांची वर्तमानपत्रांनी घेतलेली दखल हा एक महत्वाचा व अभ्यासाचा विषय आहे. राजकारण व माध्यमे यांचा घनिष्ठ संबंध आहे.[9] एखाद्या वर्तमानपत्राने विषिष्ट घटनेची घेतलेली दखल व त्या घटनेचे केलेले सादरीकरण यास अनेक घटक जबाबदार असतात. त्या जबाबदार घटकांचा अभ्यास करुन  बातमी मुल्यांच्या आधारे त्या घतनेचे सादरीकरण ही वर्तमानपत्रांची सामाजिक-राजकीय जबाबदारी आहे.[10]
पत्रकारिता-  
वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणी, रेडिओ, इंटरनेट यांव्दारे शोधुन काढलेली  माहीती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे यास पत्रकारिता असे म्हणतात. आदर्श पत्रकारितेचे मुख्यत्वेकरुन चार कार्ये आहेत. १) माहिती देणे २) अन्वयार्थ लावणे.  ३) मार्गदर्शन करणे.४) मनोरंजन करणे इ. होय. [11]
वर्तमानपत्रे, रेडिओ, टेलिव्हिजन आणि माहिती महाजालाद्वारे शोधून काढलेली माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे याला सर्वसाधारणपणे पत्रकारिता असे म्हणतात. पत्रकारिता ही एखादी वस्तू किंवा उत्पादन नव्हे तर एक प्रक्रिया आहे. काही दशकांपूर्वी ही प्रक्रिया एकतर्फी समजली जात होती ज्यात पत्रकार जे सांगत होते ते प्रेक्षक ग्रहण करत होते. आता प्रेक्षकही या प्रक्रियेत सहभागी होतात, त्यांच्याकडे पाठवलेले संदेश स्वत:च्या अनुभवांच्या आधारे पडताळून पाहतात आणि त्या संदेशाबाबत स्वत:चे अनुमान काढतात. [12]   मॅक्नायरच्या मता प्रमाणे प्रत्यक्ष जगाचा पत्रकाराने स्वत:पुरता अनुभवलेला आणि केलेला खुलासा, त्यावर एखाद्या माध्यमाच्या  विशिष्ट आवश्यकता लक्षात घेऊन केलेले संस्कार ज्यायोगे तो अनेक लोकांना सांगता येईल या प्रक्रियेला पत्रकारिता म्हणतातमॅक्वेल म्हणतो पत्रकारिता म्हणजे पैसे घेऊन केलेले लिखाण आणि दृकश्राव्य माध्यमांच्या बाबतीत असे जन माध्यम जे सर्वसामान्यजनांसाठी प्रसंगोचित नुकत्याच घडलेल्या   घटना सांगते. पत्रकारिता ही सर्वसामान्य लोकांना त्यांच्या भोवती असलेल्या जगाची जाण करून देणारी आणि त्या जगाशी कसे वागावे याबाबतचे निर्णय घेण्यासाठी लागणारी माहिती पुरविणारे साधन आहे हा विचार आता खूप बदलला आहेपत्रकारितेच्या प्रक्रियेतून आता माध्यम संस्थांना माहितीचे पैशात मूल्य स्पष्ट कळले आहे. त्यामुळे पत्रकारिता ही केवळ एक प्रक्रिया राहिली नसून त्यातून निघणारी माहिती, विश्लेषण, प्रतिमा, रचना इत्यादी हे पत्रकारितेच्या प्रक्रियेचे उत्पादन म्हणून आता ओळखले जाते आणि याचे मूल्य समाजातील वेगवेगळ्या स्तरावर आकारले जाते आहे. पत्रकारितेच्या प्रक्रियेला लागणारा पैसाही आता अनेक पटींनी वाढला आहे. जिवंत होता हे सुद्धा माहिती नव्हते.[13]
बातमी -       
घडलेल्या घटनेचे प्रांसंगीक वर्णन म्हणजे बातमी  होय. [14]
वर्तमानपत्रातील  कल्पना, घटना किंवा संघर्षाचा विस्तृत अहवाल ज्यात बातमी ग्राहाकांना रुची वाटते आणि जो सादर केल्याने सादरकर्त्यांना त्यातून नफा किवा फायदा मिळेल त्या अहवालस बातमी असे म्हणतात. [15]
बातमीच्या निवडीचा एकच निकष म्हणजे बहुसंख्य वाचकांचा इंटरेस्ट . येथे इंटरेस्ट या शब्दाला दोन अर्थ आहेत. ,माणसांना या ना त्या कारणाने ज्यांत रुची आहे अशा गोष्टी किंवा घटना एखाद्या शहराचा पाणीपुरवठा जर एक दिवस बंद राहणार असेल तर तेथे राहणा-या जवळ-जवळ प्रत्येकांच्या दृष्टीने ही बातमी अतीशय महत्वाची ठरते. पण पावसामुळे एखादा क्रिकेटचा सामना सोडून द्यावा लागला तर त्या बातमीचे महत्व क्रिकेट शौकिनांपूरतेच मर्यादित असते. माणसांचे महत्वाचे हितसंबंध हा एक अर्थ आणि दुसरा असा की बातमीच्या निवडीचा एकच निकष म्हणजे बहुसंख्य वाचकांचा इंटरेस्ट. येथे इंटरेस्ट या शब्दाला दोन अर्थ आहेत. माणसांचे महत्वाचे हितसंबंध हा एक अर्थ आणि दुसरा असा की, माणसांना या ना त्या कारणाने ज्यांत रुची आहे  अशा गोष्टी किंवा घटना. एखाद्या शहरचा पाणीपुरवठा एक दिवस बंद राहणार असेल तर तेथे राहणा-या जवळ-जवळ प्रत्येकांच्या दृष्टीने ही बातमी अतिशय महत्वाची ठरते. पण पावसमुळे एखादा क्रिकेटचा सामाना सोडून द्यावा लागला तर त्या बातमीचे महत्व फक्त क्रिकेटच्या शौकिनांच्यापूरतेच मर्यादित असते. [16] बातमी म्हणजे पत्रकारीतेचा आत्मा होय. बातमी म्हणजे वर्तमानपत्रांचे  उत्पादन होय. सामाजिक, राजकीय व आर्थिक घडामोडींतून  बातमीचा उगम होतो. [17]
वर्तमानपत्र / वृत्तपत्र -                                 
सार्वजनीक बातम्या किंवा सार्वजनीक बातम्यांवरील भाष्य नियतकालिक स्वरूपात छापण्याचे कार्य म्हणजे वृत्तपत्र होय. आजूबाजूला, जवळ आणि दूर, जे जे काही घडत असते त्यामधून प्रातिनिधीक आणि अपवादात्मक असे जे असेल त्याची निवड करुन आपापल्या ध्येय धोराणानुसार केलेली नोंद होय. [18]
मुख्यत: वार्ता तसेच मते , जाहिराती, रंजक व अन्य पुरक मजकूर यांचा समावेश असलेले, ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरीत केले जाणारे प्रकाशन म्हणजे ’वृत्तपत्र’. रोजच्या ताज्या घडामोडींच्या वार्ता देणे, जाहिराती प्रसृत करून उद्योग व व्यवसायाला चालना देणे, लोकमत घडवणे व प्रभावित करणे तसेच लोकमताचे नेतृत्व करणे, प्रबोधन करणे, शासन व्यवस्थेवर अंकुश ठेवणे अशा विविध उद्दिष्टांनी आधुनिक नागर संस्कृतीत विकसीत झालली संस्था, असे वृत्तपत्र माध्यमाचे वर्णन केले जाते. स्थानिक, देशांतर्गत आणि जागतिक स्वरूपाच्या विविध बातम्या ताबडतोब पुरवणे, हा वृत्तपत्रांचा मुख्य हेतू इतर नियतकालीकांपेक्षा त्यांचे वेगळेपण स्पष्ट करणारा आहे. वार्ता आणि विचारप्रसार या दोन अंगानी मिळून वृत्तपत्र बनते. वृत्तपत्र हे सामान्य माणसाचे व्यासपीठ मानले जाते. माहिती, मनोरंजन, मार्गदर्शन व सेवा ही वृत्तपत्राची चार प्रकट कार्ये होत. [19]
विपूल, विस्तृत व विविधांगी स्वरूपाच्या बातम्या देणे, हे वृत्तपत्राचे आद्यकर्तव्य होय. मात्र वार्ता म्हणजे काय याची काटेकोर, सर्वमान्य व सर्वसमावेशक व्याख्या करणे कठीण आहे. वाचकाला आधी माहीत नसलेली हकिकत नव्याने कळवणे, ताज्या घटना घडामोडींची वस्तूनिष्ठ माहिती शीघ्रतेने व तत्परतेने पुरवणे, हे वार्तेचे स्थूल रूप म्हणता येईल. वार्तेचा ताजेपणा, नावीन्य व घडलेल्या घटनेचे महत्त्व ही प्रमुख वार्तामूल्ये होत. नजीकच्या भविष्यात काय घडू शकेल ह्याचा अंदाज वर्तवणे, हेही वृत्तपत्रीय वार्ताकथनाच्या कक्षेत येते. वार्तेचा ताजेपणा, नावीन्य याबरोबरच स्थलसान्निध्य वा स्थानिकत्व, व्यक्तिमहात्म्य अथवा पदमहात्म्य, एखाद्या घटनेचे संभाव्य दूरगामी परिणाम ही काही महत्वाची वार्तामूल्ये होत.स्वातंत्र्योत्तर कालखंडातील मराठी पत्रकारितेतील आचार्य अत्रे यांच्या ’मराठा’ या दैनिकाची कामगिरी महत्त्वाची आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून मराठाचा जन्म झाला. अस्सल मराठी बाण्याचे वृत्तपत्र म्हणून मराठाने संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात फार मौलिक कार्य केले आहे. प्रामुख्याने मुंबईतील इंग्रजी वृत्तपत्रांचा या आंदोलनाला व भाषावार प्रांतरचनेला विरोध होता. मुंबईतील इंग्रजी वृत्तपत्रांचे मालक अमराठी भाषक आणि महाराष्ट्र द्वेष्टे होते.(९०) स्वातंत्र्योत्तर काळात राजकीय पक्षांना आपले स्वत:चे वृत्तपत्र असावे असे वाटू लागले. सार्वत्रिक निवडणूकांमध्ये आपल्या राजकीय विचारांच्या प्रचाराचे साधन म्हणूनही वृत्तपत्रांकडे पाहिले जाउ लागले. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेने ’महाराष्ट्र टाईम्स’ हे दैनिक १९६२ सालापासून मुंबईत चालू झाले. मराठवाड्यातील मराठी पत्रकारितेचा हैदराबादच्या मुक्तिसंग्रामाशी निकटचा संबंध आहे. मराठवाड्यातील पत्रकारितेवर निजामी राजवटीचे दडपण दीर्घकाळ होते. अमरज्योती, निजाम विजय व मराठवाडा यांसारखी मोजकी वृत्तपत्रे साप्ताहिक रूपात प्रसिद्ध होत होती. हैदराबादच्या लढ्यासाठी वृत्तपत्राची गरज होती. सुरुवातीला पुण्याहून व नंतर मुंबईहून ’मराठवाडा’ छापून मराठवाड्यात पाठवला जात असे. महाराष्ट्रात मराठी वृत्तपत्रांची वाढ दिवसेंदिवस झपाट्याने होत आहे. शहर, जिल्हा व राज्यपातळीवरील प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्रांची संख्या अलीकडच्या काळात खूपच वाढली आहे. [20]
वाचक  संज्ञेचे स्पष्टीकरण-                                                                                     
वर्तमानपत्रांचे वाचक, आकाशवाणीचे श्रोते आणि दूरदर्शन आणि इंटरनेटचे श्रोते-प्रेक्षक या सगळ्यांना प्रेक्षक ही संज्ञा लागू होते. अनेक अभ्यासकांनी पत्रकार आणि प्रेक्षक यांच्यातील नात्याचा अभ्यास केला आहे. हॅरिसन(२०००) इत्यादींच्या अभ्यासावरून असे लक्षात येते की पत्रकार आणि प्रेक्षक आणि माध्यम संस्था आणि प्रेक्षक यांचे नाते वेगवेगळे असते. त्याचबरोबर माध्यमे आणि प्रेक्षक एकमेकांवर परिणाम करतात. पत्रकार हे प्रेक्षकांकडे संख्यात्मक दृष्टिने पाहत नाहीत तर गुणात्मक दृष्टिने पाहतात. त्यामुळे प्रेक्षक कुठल्या विचारसरणीचे आहेत, त्यांची भावात्मक, राजकीय, सामाजिक व नैतिक घडण कशी आहे इत्यादींचा विचार पत्रकार जास्त करतात. याउलट माध्यम संस्था हे प्रेक्षकांकडे संख्यात्मक दृष्टीने पाह्तात. यामुळे कधीकधी माध्यम संस्था आणि पत्रकार यांच्यात संघर्ष निर्माण होतो. उदाहरणार्थ संपादकीय धोरणामुळे जर पाच टक्के प्रेक्षकांनी वर्तमानपत्र बदलले किंवा दूरचित्रवाणीची वाहिनी बदलली तर माध्यम संस्थेतील व्यवस्थापन संपादकीय विभागाला आपले धोरण बदलण्याचा आग्रह धरु शकते. त्याउलट संपादकीय विभाग असे म्हणेल की ज्याअर्थी पंच्याण्णव टक्के लोकांनी तेच वृत्तपत्र किंवा वाहिनी कायम ठेवले आहेत त्याअर्थी लोकांना बदलले संपादकीय धोरण मान्य आहे व तेच कायम ठेवावे. वाचकांची पत्रे, एसएमएस, ईमेल इत्यादींद्वारे पत्रकार व माध्यमे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव आणि विचारांची दिशा पडताळून पाहत असतात. प्रेक्षकही आपली मते माध्यमांपर्यंत पोहोचवत असतात. जे लोकहिताचे असते ते नेहमीच सर्व लोकांच्या पचनी पडणारे नसते आणि लोकांना जे आवडते ते नेहमीच हिताचे नसते. यामुळे लोकहित जपावे की लोकांची आवडनिवड पुरवावी असा प्रश्न पत्रकार आणि माध्यम संस्थांना सतावत असतो व त्यांच्यामधील संघर्षाचे कारणही होतो. त्याचबरोबर असेही आढळले आहे की प्रेक्षक हे सुप्त ग्राहक नव्हेत. ग्राहकांच्या सामाजिक, कोणतीही गोष्ट सांस्कृतीक प्रभावापासून दूर नाही. नागरिकारणाच्या प्रक्रियेतला तो एक अविभाज्य घटक आहे आणि त्याद्वारे आपल्या आयुष्यातील घटना घडत असतात. [21]
मराठी वृत्तपत्र वाचक :
वेळेची आणि सदर संशोधनाची गरज म्हणून संशोधकाने स्व-गृहित व्याख्या सदर ठिकाणी वापरलेली आहे.
जो वाचक मराठी भाषेतील वृत्तपत्राचे वाचन करतो अशा वाचकास ’मराठी वृत्तपत्र वाचक’ असे म्हणतात.
राजकीय बातमी- 
मतदान,घोटाळे, नागरी समस्या, राजकीय बातम्या, राजकीय भाषणे,भेटी,सभा ,मुलाखाती असणारा मजकू र म्हणजे राजकीय बातमी होय. संदेश व दळणवळण क्रांतीमुळे राजकीय घटना वाचकांपर्यंत , श्रोत्यांपर्यंत पोचवणे सहज शक्य झाले. [22]
माध्यंमांद्वारे प्रसिध्द होणा-या राजकीय बातम्या लोकमत घडवण्यास मदत करतात.  माध्यामांकडून होणा-या राजकीय बातम्यांच्या वार्तांकनावरुन माध्यमांची राजकीय विचारधारा लक्षात येऊ शकते. माध्यमे ही पूर्वग्रहदुषीत होण्यामागचे राजकीय बातमी  हे एक मुख्य कारण आहे. [23]
द टाईम्स मॅगझिनच्या आशिया क्षेत्राच्या संपादकांनी अलिकडॆच भारतीय वृत्तपत्राना असा सल्ला दिला की,त्यांनी ‘ इट पॉलिटीक्स- ड्रिक्स पॉलिटीक्स आणि स्पीच पॉलिटिक्स’ हा अतिरेकी प्रकार कमी करून वाचकांच्या गरजा ओळ्खून मजकूर द्यावा. याचा अर्थ असा होतो की भारतीय वर्तमानपत्रांमध्ये राजकीय बातम्याना अधिक महत्व दिले जाते.  एखाद्या राजकीय बातमीत एखादा घटक अनुपस्थित असणे यालाही महत्त्व आहे. पत्रकारिता आणि संवाद यांचा अभ्यास अनेक दशकांपासून सुरू आहे. यातील बराच काळ या विषयाचे विश्लेषक असे गृहीत धरून चालले होते की लास्वेलच्या सूत्रानुसार पत्रकारितेच्या अभ्यासात कोण कोणास काय म्हणाले आणि त्याचा परिणाम काय झाला, हेच महत्त्वाचे पैलू होते. मात्र, लिहिलेल्या मजकुरातून अर्थ हा केवळ ‘असण्याने’ नसून एखादा शब्द किंवा विचार ‘नसण्याने’, अथवा आठवणी जागृत करूनसुद्धा दर्शवता येतो. त्यामुळे कोण कोणास काय म्हणाले याचबरोबर कोण म्हणाले नाही,कोणास म्हणाले नाही ,काय म्हणाले नाही हे, कळणे कठीण असले तरी, तितकेच महत्त्वाचे असते . [24]
ग्रामीण भाग-
ग्रामीण भाग म्हणजे असा प्रदेश जाचे कर उत्पन्न, कर शूल्क हे शहरी भागाच्या तूलनेत कमी असते. ज्याच्यावर जिल्हा प्रशासनाचं नियंत्रण असतं असा प्रदेश. तसेच  महानगरपालिका,नगरपालिका किंवा लक्ष्कराने घोषीत वा जाहीर केलेला प्रदेश म्हणजे ग्रामीण भाग होय. [25]
शहरी भाग-
ज्या प्रदेशाची लोकसंख्या ही ५०,००० अधिक असुन ७५% लोकसंख्या ही कृषीएतर व्यवसायात गुंतलेली असेल आणि ज्या प्रदेशाची घनता ही ४०० स्केवर कि.मी किंवा त्यापेक्षा अधिक आहे असा प्रदेश होय. [26]
असा प्रदेश की ज्या प्रदेशातील लोकसंख्या ही एका विशीष्ट ठरवलेल्या विभागातच कार्य करतात. असा भाग असतो ज्या भागाची मुख्य गुंतवणूक ही वाहतुक आणि दळवळण, बॅंक, सेवा क्षेत्र ,उद्योगांची उभारणी यास यासाठी गुंतवली जाते. घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, विज,शाळा, दवाखाने, वाचनालये,शिक्षण यासाठी कराचा मोठा भाग हा खर्ची पावत असतो. [27]
ग्रामीण वर्तमानपत्र - 
तालुकास्तरावरुन प्रसिध्द होणारी व त्या-त्या भागाचे प्रतिनिधीत्व करणारी स्थानीक वृत्तपत्रे ज्यांची कुठलीही साखळी नसते(एडीशन) असे वर्तमानपत्र म्हणजे   होय.
शहरी वर्तमानपत्र   - 
जिल्हांच्या आणि महानगरपालिकांच्या ठिकाणांवरुन प्रसिध्द होणारी सर्व वृत्तपत्रे म्हणजे शहरी वर्तमानपत्र होय.
वर्तमानपत्रांचे वितरण-
एका दिवसाला संबंधित वर्तमानपत्राच्या किती प्रती विकल्या जातात किंवा किती  प्रतींची मागणी आहे त्यास  वितरण संबोधतात.  जागतीक पत्रकार संघटना जागतीक स्तरावर वृत्तपत्रांच्या वितरणाची सर्वेक्षणे दरवर्षी प्रसिध्द. वॅन (WAN-World Association of Newspaper)म्हणजेच जागतीक पत्रकार संघटना यांची  आकडेमोड विश्वसनीय मानली जाते. [28]
खप -
वर्तमानपत्रांच्या संदर्भात सर्क्युलेशन या शब्दाचा अर्थ खप असा होतो. खप होणे हे वर्तमानपत्रांसाठी फार महत्वाचे असते. याचे कारण वर्तमानपत्रांचे आयुष्य हे एका दिवसाचे असते.काही अपवाद वगळता कालचे वर्तमानपत्र हे आज वाचले जात नाही. वृत्तपत्राचा खप किती यावर जाहिराती किती मिळतील हे जाहिरातदार ठरवीत असतात.वृत्तपत्रांचा खप किती आहे हे ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशनकडून पाहिले जाते. याची आकडेवारी जाहीर केली जाते. [29]
     वर्तमानपत्राचे नाव                            वर्ष                                    खप
लोकमत, जळगाव आवृत्ती         -    जुलै-डिसेंबर २००६       -           ९८०७१                       
लोकसत्ता,अहमदनगर आवृत्ती     -  जुलै-डिसेंबर २००६         -           २००००
वरील आकडेवारीवरुन आपणास वर्तमानपत्रांचे खपाचे गणित कळून येते. ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशने ही आकाडेवारी घोषीत केलेली आहे. [30]
व्दारपाल – (गेटकिपर)
घटना अनेक असतात पण बातमी कशाची होते? या प्रश्नाने माध्यम अभ्यासकांना गेली अनेक दशके पछाडले आहे. याबाबतचा सर्वात अभ्यास एकोणिसशेसाठच्या (१९६०) दशकात गाल्टुंग आणि रूज यांनी केला. घटनेची बातमी होण्यामागील कारणांचा अभ्यास करताना गाल्टुंग आणि रूज यांनी बारा गुणांचे विश्लेषण केले. नंतरच्या काळात माध्यमांचा प्रसार वाढत गेला, नवे तंत्रज्ञान आले, एककेंद्राभिमुखता वाढत गेली आणि हे गुण बदलले, कधी त्यांत आणखी गुणांची भर पदली, कधी त्यांची संख्या कमी करण्यात आली. या अभ्यासातूनच बातमीचे द्वारपाल ही संज्ञा तयार झाली. कुठल्याही माध्यम संस्थेमधे घटनांच्या माहितीचा अक्षरश: पूर येत असतो. माहिती तंत्रज्ञानाच्या वाढीमुळे तर हा प्रवाह उत्तरोत्तर वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत कुठल्या घटनेची बातमी करायची याबाबतचे निर्णय नेहमीच शास्त्रीय निकषांवर ठरत नाहीत. [31] पण मग ते निकष कुठले आणि अधिक महत्त्वाचे म्हणजे ते निकष ठरवून ते घटनांच्या संदर्भात कोण लावतो? द्वारपाल म्हणजे ती व्यक्ती जी हे काम करते. माध्यम संस्थेमधे बातम्यांची उतरंड ठरवण्याची जबाबदारी ज्याच्यावर असते तो द्वारपाल. ही सकंल्पना जरी आकर्षक वाटत असली तरी याचा अभ्यास करणे अतिशय जिकरीचे आहे आणि त्यातून मिळणारे निष्कर्ष विशिष्ट संदर्भातच वापरता येतात. उदाहरणार्थ वार्ताहर घटनास्थळी असतो, त्यामधे तो अप्रत्यक्षरित्या सहभागी होत असतो. घटनेबाबतची बातमी तयार करण्याच्या प्रक्रियेत तो अजाणतेपणी द्वारपाल होतो कारण घटनेची उतरंड कशी मांडावी यात कशाला महत्त्व द्यायचे हे तो ठरवत असतो. बातमी त्याने आपल्या उपसंपादकाकडे दिली की तो त्याला मथळा देतो, पानात विशिष्ट स्थान आणि आकार देतो ज्यामुळे पुन्हा एकदा त्या त्या पानावरील बातम्यांची उतरंड तयार होते. यामधे उपसंपादक द्वारपाल होतो. यापुढे जाऊन वाचक सगळ्याच बातम्या वाचत नाहीत आणि ते ही अशाच प्रकारे बातम्यांची एक उतरंड तयार करतात. [32]
स्थानिक वृत्त -  
वर्तमानपत्र  ज्या ठिकाणाहून प्रसिध्द होते तेथील बातम्या होय. वाचकांची रुची लक्षात घेऊन वर्तमानपत्रांना स्थानिक भागातील बातम्यांना आपल्या पत्रकात समाविष्ट करावे लागते.[33] वाचकांची मागणी (स्थानिक), प्रादेशीकता लक्षात घेऊन वर्तमानपत्रांमध्ये वार्तांकित झालेली घटना म्हणजे स्थानिक बातमी होय. [34]
वर्तमानपत्राची वाचक संख्या - 
म्हणजे नेमून दिलेल्या कालावधीत किती लोक वर्तामानपत्राची खरेदी करतात,वाचन करतात त्यांची  संख्या होय. जो राष्ट्रीय वाचक सर्वेक्षण या विभागातर्फे केला जातो.  [35]
संशोधन सिध्दांत-
सामाजिक जवाबदारी सिध्दांत-
प्रसार्माध्यमांनी जवाबदारपणे बातम्यांचे वृत्तांकन करुन त्यांवर प्रकाशझोत टाकला पाहिजे. वार्तांकन केलेल्या कूठल्याही बातमीत सत्यता असली पाहीजे. सर्वसामान्यांना समजेल अशा शब्दांत पण बौध्दिक पातळीवर बातम्यांना योग्य पध्दतीने मथळा(हेड लाईन) दिला पाहिजे. प्रसारमाध्यमांनी समाजाचे प्रतिबिंब रेखाटतांना समाजाशी निगडीत असणारी तत्त्वे आणि महत्व तसेच गांभीर्य योग्यरित्या हाताळले पाहीजे.या सिध्दांतात पत्रकारितेची तीन मुख्य उदिष्टे सांगितली.
१)प्रसारमाध्यमानी समाजाबध्द्ल वचनबध्द असावे.
२)प्रसारमाध्यमांकडून  होणा-या वार्तांकनात अचूकता असावी.
३)प्रसारमाध्यमे बंधनमुक्त असले तरी त्यांना मर्यादा असाव्यात. [36]
वर्तमानपत्र शहरी असो की ग्रामीण त्यांची सामाजिक जबाबदारी म्हणून त्यांना प्रदेशानुसार अणि वाचकांच्या मागणी नुसार समाजात घडणा-या (स्थानिक) घडामोडींना आपल्या पत्रकात स्थान हे द्यावेच लागते. हीच प्रादेशिकता आणि वाचकांची मागणी प्रदेशानुरुप वेगवेगळी असते . ज्याचा परिणाम हा बातम्यांच्या वार्तांकनावर होतो. त्यामुळे हा सिध्दांत येथेही लागू पडतो. 
द्वारपालाचा  सिध्दांत (गेटकिपींग थेरी) -
या सिध्दांताची ओळख आणि गरज पटवून दिली ती कुर्ट लेविन या माध्यम अभ्यासकाने. मात्र संशोधक डेविड मेनिंग यांनी या संकल्पनेचा पत्रकारितेच्या अनुशंगाने अभ्यास केला. बातमीदार ते संपादक यांचा स्व अनुभवाचा परिणाम बातमीवर घडून येतो असा हा सिध्दांत सांगतो. बातमीदारापासून ते संपादक आपल्या अनुभवांचा आणि अधिकारांचा वापर घटनेला,प्रसंगालाब बातमीचे स्वरूप प्राप्त करुन देतो.बातमी संस्कार तो करतो. ज्याचा परिणाम बातमीच्या आशयावर होतो. [37] पत्रकार हे नेहमी घडणा-या घटनेपेक्षा अनपेक्षितपणे घडणारी घटना वृत्तपत्रात बातमी म्हणून शोधत असतात.अशाच अनपेक्षित घटनांना पत्रकार ज्यास्त जागा,मोठा मथळा आणि पहिल्या पानावर मांडत असतो.रॉसनग्रेन या अभ्यासकाने प्रसारमाध्यमांच्या  निवडीच्या संभाव्य नियमावलीचे योग्य असे विभाजन केले आहे. रॉसनग्रेने निवडक,संख्यात्मक आणि गुणात्मक गेटकिपिंग असे विभाजन केलेले आहे. निवडक गेटकिपिंग मध्ये एखादी घटना ही बातमी म्हणुन अभ्यासली जाते. संख्यात्मक गेटकिपिंगमध्ये लेखाचा आकार यास महत्व असते तर,गुणात्मक गेटकिपिंगमध्ये सादरीकरण महत्वाचे ठरते. त्यात वृतपत्रातील स्थान,वृत्तपत्रातील पान,मथळा,रंग आणि मांडणी या पध्दतीने गेटकिपिंग होत असते .[38] परिणामी ग्रामीण आणि शहरी भागातील राजकीय बातम्यांचे प्रमाण हे कमी अधिक पहावयास मिळते. त्यामुळे हा सिध्दांत येथे लागू पडतो.
  





प्रकरण क्रमांक-३

 

संशोधनाची रचना-
                        
संशोधनाचा दृष्टीकोण-        
शास्त्र ही संकल्पना फक्त शास्त्रीय अध्ययनाच्या क्रमवार पायऱ्यांवर अवलंबलेली नसून ती अभ्यासकाच्या प्रवृत्तीवर अवलंबलेली असते व ही प्रवृत्ती अधिक तार्किक (Logical), बुद्धिवादी (Rational), वस्तुनिष्ठ (Objective) स्वरुपाची असणे आवश्यक असते.
अनुभव प्रामाण्यता (Empiricism)-
ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून विविध प्रकारचे बरे वाईट अनुभव हे प्रत्येक व्यक्तिला नेहमी येत असतात व त्या अनुभवाच्या आधारावर जीवनाचा एक विशिष्ट मार्ग आखण्याचा मानव प्रयत्न करीत असतो. याच स्वानुभावातून एखाद्या घटनेवर विश्वास ठेवण्याची प्रवृत्ती ही मानवात आढळून येते. शास्त्रीय अध्ययनाच्या प्रक्रियेत एखाद्या घटनेचे निरिक्षण करतेवेळी अभ्यासकाला स्वत:हून कोणता अनुभव आला यावर अनुभवाधिष्ठीत मूल्याचा शास्त्रीय अध्ययनात भर दिला जातो.
सामाजिक घडामोडींच्या शास्त्रीय अध्ययनाच्या प्रक्रियेत अभ्यासकाने स्वत:च्या अनुभवा बरोबरच समाजातल्या विविध स्तरातील लोकांच्या अनुभवात्मक स्वरूपाच्या प्रतिक्रिया जाणून घ्याव्या लागतात व अशा प्रतिक्रियांच्या आधारावर एखाद्या घटनेची वास्तवता विशद करण्याचा अभ्यासकाने प्रयत्न केला पाहिजे. मानवाची बुद्धिमत्ता ही स्वानुभावातून विकसित होत गेलेली आहे. म्हणून अनुभव प्रामाण्यता हा एक शास्त्रीय अद्ययनाचा मूलभूत निकष मानला जातो. अनुभवाधिष्ठीत ज्ञान हेच खरे ज्ञान आहे, असे संबोधले जाते. परंतू त्या ज्ञानाची वास्तवता आणि शास्त्रीयता आजमावून पाहण्याचा प्रयत्न अभ्यासकाने करावा लागतो. प्रत्येक व्यक्तिचे अनुभव हे जरी वेगवेगळे असले तरीसुद्धा सामाजिक वास्तवतेचा आशय विशद करतेवेळी अनुभवाधिष्ठीत ज्ञानाचा आधार घेतला जातो. त्यामुळे अनुभव प्रामाण्यता हे एक शास्त्रीय मूल्य म्हणून ओळखले जाते. आपली ज्ञानेंद्रिये सक्षम (Active) ठेवून स्व-अनुभवाच्या आधारावर सत्याचा शोध घेण्याची प्रवृत्ती अभ्यासकाने अंगिकारावी लागते. [39]
वरील विवेचन लक्षात घेतल्यास संशोधकाने संशोधनासाठी निवडलेला अभ्यास विषय हा संशोधकाच्या व पत्रकारांच्या अनुभव विश्वाशी निगडीत आहे. म्हणजेच तो अनुभवप्रामाण्य (Empirical) आहे. ह्या दृष्टीकोनातून संशोधकास त्याच्या संशोधनाच्या निष्कर्षाप्रती पोहोचणे शक्य होणार असल्याने संशोधकाने अनुभवप्रामाण्य दृष्टीकोनाचा अवलंब करण्याचे ठरवले आहे.
 संशोधन प्रश्न:
१.ग्रामीण वर्तमानपत्र आणि शहरी वर्तमानपत्र म्हणजे काय ?
२.राजकीय बातमी म्हणजे काय ?
३.वर्तमानपत्रांचे ग्रामीण आणि शहरी असे विभाजन शक्य आहे का ?
४.ग्रामीण वर्तमानपत्रांमध्ये राजकीय बातम्यांना विषेष प्राधान्य का दिले जाते ?
५.शहरी वर्तमानपत्रांत राजकीय बातम्यांना दुय्यम स्थान दिले जाते का ?
संशोधनाचा उद्देश्य:
१.वर्तमानपत्रांचे असलेल्या ग्रामीण आणि शहरी विभाजनाचे अध्ययन करणे.
२. ग्रामीण वर्तमानपत्रांमध्ये राजकीय बातम्यांना विषेष प्राधान्य  दिले जाते का ते पाहणे.
३. शहरी वर्तमानपत्रांत राजकीय बातम्यांना दुय्यम स्थान दिले जाते का ते तपासणे.
४. राजकीय बातमी म्हणजे काय त्याचा अभ्यास करणे.
५. शहर आणि ग्रामीण म्हणजे काय ते पाहणे.
संशोधनाची उपयुक्तता:                                     
या संशोधनामुळे ग्रामीण वर्तमानपत्र आणि शहरी वर्तमानपत्र म्हणजे काय  ते जाणून घेता येऊ शकते. तसेच ग्रामीण वर्तमानपत्रांमध्ये राजकीय बातमीला प्राधान्य का दिले जाते ते समजून येण्यास मदत होईल.  राजकीय बातमी म्हणजे काय ते समजण्यास संशोधकास मदत झाली. राजकीय बातम्यांकडे माध्यमांचा (वर्तमानपत्रांचा) पाहण्याचा दृष्टीकोण समजून येण्यास मदत होऊ शकते. 
गृहीतक-              
ग्रामीण वर्तमानपत्रांमध्ये शहरी वर्तमानपत्रांच्या तुलनेत राजकीय बातम्यांचे प्रमाण अधिक असते. 
शून्य गृहीतक -
ग्रामीण वर्तमानपत्रांमध्ये शहरी वर्तमानपत्रांच्या तुलनेत राजकीय बातम्यांचे प्रमाण कमी असते. 
वरील गृहीतकात दोन चल आहेत.                                                                  
ग्रामीण आणि शहरी वर्तमानपत्रांतील राजकीय बातमीचा अभ्यास सदर संशोधनात केला जाणार असल्याने राजकीय बातमी हे स्वतंत्र चल आहे . तर ग्रामीण आणि शहरी  वर्तमानपत्रांच्या आधारे राजकीय बातम्यांचा अभ्यास केला जाणार असल्याने ग्रामीण व शहरी वर्तमानपत्र हे  निर्भर चल आहे. 
संशोधनाची समस्या:
ग्रामीण वर्तमानपत्रांमध्ये शहरी वर्तमानपत्रांच्या तूलनेत राजकीय बातम्यांचे प्रमाण अधिक असते हा संशोधनचा विषय आहे. यामध्ये मूळ विषयाला अनुसरुन राजकीय बातमी,ग्रामीण आणि शहरी वर्तमानपत्र काय हे संशोधकास विस्तृतपणे मांडणे गरजेचे आहे.
संशोधन पद्धत-
सदर संशोधनासाठी संशोधकाने सर्वॆक्षण व प्रत्यक्ष मुलाखत या पद्धतींचा वापर केलेला आहे.
संशोधन पद्धती-
वर्णनात्मक संशोधन पद्धती आणि संख्यांत्मक संशोधन पद्धती.
प्रत्येक संशोधना दरम्यान समस्या निराकरण कर-यासाठी एक व्यवस्थित आणि विषिष्ट पद्धत आवश्यक असते. संशोधाचा प्रकार आणि उपलब्द माहितीनुसार संशोधनासाठी आवश्यक नमून्याची निवड होते. संशोधनकर्ताला ग्रामीण वर्तमानपत्रांनमध्ये राजकीय बातम्यांचे प्रमाण शहरी वर्तमानपत्राच्या तूलनेत अधिक असते की नाही हे पाहणे आवश्यक होते. त्याकरिता संशोधकाने संख्यात्मक आणि वर्णनात्मक संशोधन पध्दतीचा अवलंब केला आहे .  
नमुना निवड पद्धत-
वर्णनात्मक संशोधन आराखडा पद्धतीचा वापर संशोधकाने संशोधना दरम्यान केलेला आहे.
संशोधकाने तथ्थे संकलित करण्याचा उद्देश ठेवला पहिजे व त्या तथ्यांच्या आधारे संशोधनाचा आराखडा विकसित केला पाहिजे. अशा रितीने तथ्थाधिष्ठीत  माहितीच्या आधारे वर्णनात्मक विश्लेषण करणे म्हणजे वर्णनात्मक शोध आराखडा तयार करणे. या आराखड्यात मुलाखती,प्रश्नावली,प्रत्यक्ष निरीक्षण,सहभागी निरीक्षण, सामुदायिक ध्वनीमुद्रण व त्याचे विश्लेक्षण या सर्व प्रकारांचा समावेष होतो. [40] याकरिता  अधिकाधिक विश्लेक्षणासाठी समाजशास्त्रज्ञ , पत्रकार व समाजसेवक आदी विविध क्षेत्रातील तज्ज्ञमंडळींच्या प्रतिक्रिया संशोधकाने मिळवल्या. तसेच महाराष्ट्र टाईम्स,लोकमत ही शहरी वर्तमानपत्र तर पनवेल येथील रामप्रहर आणि पनवेल टाईम्स ही स्थानिक ग्रामीण वर्तमानपत्र राजकीय बातम्यांच्या अनूषंगाने अभ्यासली.
आशय विश्लेषण-
बी. बेरेलसमन यांच्यामते संज्ञापनातील  व्यक्त वा प्रकट आशयाच्या वस्तुनिष्ट व संख्यात्मक वर्णनाचे आशय विश्लेषण हे एक तंत्र आहे. संशोधनास शास्त्रीय आधार मिळावा म्हणून संशोधकाने ऑक्टोबर,नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यातील वर्तमानपत्रांचे आशय विश्लेषण केलेले आहे. कारण संशोधकाला संशोधन ठराविक वेळेत संपवायचे आहे. ग्रामीण वर्तमनपत्रांचे प्रातिनिधीत्व म्हणून संशोधकाने पनवेल तालुक्यातील पनवेल टाईम्स व रामप्रहर या वर्तमानपत्रांची निवड केलेली आहे. तर शहरी वर्तमानपत्रांसाठी संशोधकाने मुंबई शहरातील महाराष्ट्र टाईम्स व लोकमत या वर्तमानपत्रांची निवड केलेली आहे. 
माहिती एकत्रित करण्याची साधने:
संशोधनासाठी संशोधकाने महाराष्ट्रातील पंधरा पत्रकारांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली. मुंबई विद्यापिठाच्या जवाहरलाल नेहरु ग्रंथालयाचा तसेच एशियाटिक लायब्रेरी येथुन माहिती एकत्रित केली. संशोधनासाठी विविध संकेस्थळांचा वापर देखील केला. तसेच लोकमत,महाराष्ट्र टाईम्स,रामप्रहर,पनवेल टाईम्स या वर्तमानपत्रांतील राजकीय बातम्यांच्या वृत्तांकनाचा अभ्यास केला. प्रसार माध्यमांच्या अभ्यासकांशी चर्चा केल्या.
संशोधनाची (मुलाखत) प्रश्नावली-
गुडे आणि हॉट यांच्यामते , सामान्यारुपाने प्रश्नावली म्हणजे प्रश्नांची उत्तरे प्राप्त करुन घेण्याची पध्दती असून तिच्यात प्रश्नपत्रिकेचा उपयोग केला जातो व त्या  प्रश्नांची उत्तरे प्रश्नकर्त्याला स्वत: द्यावी लागतात. [41]संशोधनासाठी संशोधकाने मुक्त प्रश्न या पद्धतीचा वापर करुन प्रश्नावली तयात केलेली आहे. या प्रश्नावलीच्या आधारे महाराष्ट्रातील पंधरा जेष्ठ पत्रकारांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत.
मुलाखत प्रश्नावली-
(अ) ग्रामीण वर्तमानपत्र आणि शहरी वर्तमानपत्र असे वर्तमानपत्रांचे विभाजन करता येईल का?
(ब) वर्तमानपत्रांचे असे विभाजन करता येऊ शकत असेल तर का ?
(क) वर्तमानपत्रांचे असे विभाजन करता येऊ शकत नसेल तर का ?
(ड) ग्रामीण वर्तमानपत्र म्हणजे काय?
(इ) शहरी वर्तमानपत्र म्हणजे काय ?
अशा प्रकारचे प्रश्न संशोधकाने मुलाखती दरम्यान पत्रकरांना विचारले.
प्रश्न निवडीची कारणिमीमांसा –
संशोधकाने ‘ग्रामीण व शहरी वर्तमानपत्रांतील राजकीय बातम्यांचे अध्ययन’ या आषयाचा विषय संशोधनासाठी  निवडलेला आहे. त्याकरीता संशोधनाची गरज म्हणून संशोधकाने वरिल प्रश्नांची निवड केलेली आहे.
महत्व आणि वैशिष्ट -
संशोधकास अंतीम निष्कर्षा पर्यंत पोहचण्याकरीता सदर प्रश्नांची सखोल उत्तरे अपेक्षित होती. त्यामुळे संशोधकाने ‘खुली पद्धत’ या प्रकाराला प्रश्नतालीकेत प्राधान्य दिलेले आहे. वरील प्रश्नांच्या मिळालेल्या उत्तरांच्या आधारेच संशोधक संशोधनाच्या अंतीम निष्कर्षापर्यंत पोहचू शकतो. म्हणूनच संशोधकाने संशोधनात वरील पद्धतीची प्रश्नावली वापरलेली आहे. संशोधकाने संशोधनाच्या पुर्तीकरीता पुढील पत्रकारांच्या मुलाखती घेतल्यात. मुलाखती दरम्यान पुढील प्रश्नावलीचा संशोधकाकडून वापर केला गेला.
अ . ग्रामीण वर्तमानपत्र आणि शहरी वर्तमानपत्र असे वर्तमानपत्रांचे विभाजन करता येईल का?
संशोधकाचा संसोधन विषय हा ग्रामीण व शहरी वर्तमानपत्र यावर अवलंबुन आहे. त्यामुळे वर्तमानपत्रांचे असे विभाजन आहे किंवा नाही ते पाहणे गरजेचे ठरते. त्याकरिता असा प्रश्न संशोधकाने तज्ञांना विचारलेला अहे.  
ब . वर्तमानपत्रांचे असे विभाजन करता येऊ शकत असेल तर का? (क) वर्तमानपत्रांचे असे विभाजन करता येऊ शकत नसेल तर का ?
वर्तमानपत्राचे ग्रामीण व शहरी विभाजन मुलाखतकर्त्याने मान्य केल्यास असे विभाजन कसे होऊ शकते तसेच होऊ शकत नसेल तर का ? हे संशोधनकर्त्यास समजुन घेणे गरजेचे होते त्याकरीता असा प्रश्न संसोधकाने मुलाखतीसाठी निवडला .
(ड) ग्रामीण वर्तमानपत्र म्हणजे काय? (इ) शहरी वर्तमानपत्र म्हणजे काय ?
ग्रामीण वर्तमानपत्र आणि शहरी वर्तमानपत्र हा संशोधकाच्या संशोधनाचा मुख्य विषय असल्यामुळे ग्रामीण वर्तमानपत्र तसेच शहरी वर्तमानपत्र म्हणजे काय ?हे जाणून घेण्यासाठी संशोधकाने मुलाखतीसाठी सदर प्रश्नाची निवड केलेली आहे.
सदर संशोधनाच्या परिपूर्ति करिता संशोधकाने पुढील १५ पत्रकारांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत.
मुलाखतींचा आढावा-
ग्रामीण आणि शहरी वर्तमानपत्र असे वर्तमानपत्रांचे विभाजन करता येणे शक्य आहे का? ग्रामीण आणि शहरी वर्तमानपत्र म्हणजे काय़? असे प्रश्न संशोधकला भेडसावत होते. त्यासाठी संशोधकाने वरील पत्रकारांच्या मुलाखती घेऊन त्यांची मते जाणून घेतली. काही पत्रकारांनी हे विभाजान अमान्य केले, तर काही पत्रकारांनी प्रदेशाला महत्व न देता वर्तमानपत्रांत वृत्तांकीत होणारा मजकुर महत्वाचा मानला. मजकुर जर ग्रामीण जनतेचे प्रतिनिधीत्व करत असेल आणि सदर वर्तमानपत्राचे कुठलेही साखळी वर्तमानपत्र नाही तर ते वर्तमानपत्र ग्रामीण आणि जर तो मजकुर शहरी भागातील नागरिकांचे प्रतिनिधीत्व करीत असेल तर ते वर्तमानपत्र शहरी म्हणावं लागेल असे मत व्यक्त केले.[42] ग्रामीण आणि शहरी वर्तमानपत्र असे वर्तमानपत्रांचे दोन गट आहेत हे संशोधकाला मुलाखती दरम्यान दिसून आले. वर्तमानपत्रांमध्ये ग्रामीण आणि शहरी वृत्तपत्र असा भेद आहे. परंतू वर्तमानपत्र कुठून प्रकाशित होतं त्यावरुन वर्तमानपत्र ग्रामीण किंवा शहरी ठरु शकत नाही. सदर वर्तमानपत्रात कुठल्या बातम्यांना स्थान दिलं जातं त्यावरुन ते वर्तमानपत्र ग्रामीण आहे की शहरी हे ठरवता येईल. ग्रामीण वर्तमानपत्र म्हणजे ज्या वर्तमानपत्रात ग्रामीण भागातील घटनांना बातमी म्हणून प्राधान्य दिले जाते ते आणि ज्या वर्तमानपत्रात शहरी भागातील घटनांना बातमी म्हणून प्राधान्य दिले जाते त्या वर्तमानपत्रास शहरी वर्तमानपत्र म्हणतात असे देखिल संशोधकाला मुलाखतींदरम्यान समजून आले.[43] वर्तमानपत्रांमध्ये ग्रामीण आणि शहरी वृत्तपत्र असा भेद आहे. परंतु आज माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे ग्रामीण आणि शहरी असे प्रदेशानिहाय वर्गिकरण करणे शक्य होत नाही. [44]ज्या वर्तमामानपत्रांची कुठलीही आवृत्ती नसते, आणि ज्या वर्तमानपत्रांचा खप , वाचक हा फक्त त्याच परिसरापुरता मर्यादीत असतो ती वर्तमानपत्र म्हणजे ग्रामीण वर्तमानपत्र होय. तर ज्या वर्तमानपत्रांच्या दोना पेक्षा अधिक अशा आवृत्त्या असून त्यांचा खप प्रचंड आणि वाचक हा त्या प्रदेशापुरताच  मर्यादीत नसतो अशी वर्तमानपत्र म्हणजे शहरी वर्तमानपत्र होय. मुंबईसारख्या शहरात देखिल ग्रामीण वर्तमानपत्र चालवलं जातं.[45] जास्तीत- जास्त पत्रकारांनी मात्र हे विभाजन योग्यचं असल्यांचं संशोधकाला सांगितलं. [46]ग्रामीण भागातील नागरीकांचे प्रश्न आणि समस्या या शहरी भागातील नागरीकांच्या तूलनेत भिन्न आणि वेगळ्या आहेत. शहरी वर्तमानपत्रांत त्यांच्या समस्यांना दुय्यम लेखले जातं किंवा स्थान दिलं जात नाही. त्यामुळे त्यातुनच ग्रामीण वर्तमानपत्रांचा जन्म होतो. ग्रामीण आणि शहरी असे वर्तमानपत्रांचे दोन गट आहेतच.  तालुका व नगरपालिका  स्तरावरुन प्रसिध्द होणारी वर्तमानपत्र म्हणजे ग्रामीण वर्तमानपत्र होय. तर महानगरपालिका व जिल्हा स्तरावरुन प्रसिध्द होणारी वर्तमानपत्र म्हणजे शहरी वर्तमानपत्र होय असल्याचे सांगीतले . [47] त्यामुळे संशोधनात संशोधकाने बहुसंख्यांच्या मताला प्राधान्य दिलेले आहे .
माहिती एकत्रित करण्यासठी वापरलेली पध्दती-
एकदा संशोधनासाठी तथ्य एकत्र केल्यानंतर त्या माहितीचे निरीक्षण करणे गरजेचे असते. तथ्य निरीक्षणासाठी कोड, आलेख,किवा वर्णनात्मक पध्दतीने माहितीचे विभाजन करुन परिक्षण करावे लागते. या तथ्य निरीक्षणासाठी संगणकाच्या सहाय्याने विश्लेक्षण करणे सोपे जाते त्यामुळे वेळेची बचत होते. सदर संशोधनासाठी वर्णनात्मक संशोधन पध्दतीचा वापर करण्यात येणार आहे.
संशोधनाच्या मर्यादा-
वेळेचे आणि अभ्यासक्रमाचे भान राखून संशोधकाने वरील विषय संशोधनासाठी निवडलेला आहे. सदर संशोधनाच्या पूर्तिसाठी संशोधकाने महाराष्ट्र हे राज्य निवडलेले आहे.तर महाराष्ट्रातीलच मराठी वर्तमानपत्र अभ्यासलेली आहेत. वर्तमानपत्रांमध्ये क्रिडा, राजकारण, चित्रपट यांसारखे विविध विषय मांडले जातात. त्यापैकी संशोधकाने फक्त राजकीय बातमीचा अभ्यास केलेला आहे.
पूर्व मर्यादा-
वेळेची मर्यादा लक्षात घेऊन संशोधकाने सदर संशोधन हे मुंबई शहर व पनवेल तालुका या प्रदेशाकरिता मर्यादीत ठेवलेले आहे.
संशोधकाने संशोधनाच्या पूर्तीसाठी महराष्ट्रातील मराठी वर्तमानपत्रांमध्ये काम करणा-या काही पत्रकारांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. या संशोधनासाठी संशोधकाने निवड या संशोधन पध्दतीचा वापर केलेला आहे. संशोधकाने घेतलेल्या मुलाखतींनुसार लोकसत्ता व महाराष्ट्र टाईम्स ही वर्तमानपत्र शहरी वर्तमानपत्रांत मोडतात, तर पनवेल टाईम्स,रामप्रहर ही वर्तमानपत्र ग्रामीण वर्तमनपत्रांमध्ये मोडतात. त्यामुळे संशोधकाने  शहरी वर्तमानपत्रांसाठी मुंबई शहरातील लोकसत्ता व महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांची निवड केलेली आहे. तर ग्रामीण वर्तमानपत्रांसाठी पनवेल तालुक्यातील रामप्रहर व पनवेल टाईम्स या वर्तमानपत्रांची निवड केलेली आहे.
सदर संशोधनकार्यासाठी संशोधकाने वर्तमानपत्रांचाच विचार केलेला आहे. सदर वर्तमानपत्रांद्वारे प्रसिद्ध केलेल्या पूरवण्यांचा विचार संशोधकाने केलेला नाही. तसेच संशोधकाने आशय विश्लेषणासाठी वर्तमानपत्रांच्या मुखपृष्टाचाच विचार केलेला आहे. मुखपृष्टावरील बातम्यांचाच विचार संशोधनासाठी केलेला आहे. 
वर्तमानपत्र तसेच पत्रकार ,परिसर इत्यादींची निवड संशोधकाने निवड या संशोधन पध्दतीचा पार्श्वभूमीवर केलेली आहे.
संशोधनाचे ध्येय – 
राजकीय बातमीचे ग्रामीण आणि शहरी वर्तमानपत्रांमध्ये होणा-या वृत्तांकनाचा तुलनात्मक अभ्यास करणे हे संशोधकाचे ध्येय आहे.


[1] मराठी वृत्तपत्राचा अभ्यास ,आर.के.लेले.कोन्टिंनेंटल प्रकाशन,१९८४,पृष्ठ क्र.१२.
[2] जेफरी रॉबीन, इंडियाज न्यूजपेपर रिव्होल्यूशन: कॅपिटॅलिझम, पॉलिटीक्स एण्ड दी इंडियन लँग्वेज प्रेस, १९७७-९९, सी हर्स्ट एण्ड कंपनी पब्लिशर्स,पृष्ठ- ६०, वर्ष-२०००
[3] तत्रैय २. पृष्ठ क्र. ०९.                                                
[5] रावसाहेब कसबे,आंबेडकर आणि मार्क्स,सुगावा प्रकाशन,१९८५,पृष्ठ क्र.४६.
[6] तत्रैव ४.
[7] बातमीची सर्वसाधारण क्षेत्रे,अनंत येवलेकर व एकनाथ बागूल, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ प्रकाशन, २००४,पान ३४.

[9] मॅनी,पी,ई.(सप्टें २०००). पॉलिटीकल प्रोसेस एण्ड लोकल न्यूजपेपर कव्हरेज ऑफ प्रोटेस्ट एव्हॆंटः फ्रॉम सिलेक्शन बायस टू ट्रायडीक इंटरॅक्शन. द अमेरीकन जर्नल ऑफ सोशोलॉजी, पृष्ट ४६३-५०५.
[10] झाग्ला , के,पी. सोशल मुव्हमेंट एण्ड न्यूज मीडिया. द एम.सी मास्टर जर्नल ऑफ कम्युनिकेशन(२००७)
[11]    डिक्शनरी ऑफ मीडिया एण्ड कम्युनिकेशन स्टडीज,जेम्स वॅटसन ऍन्ड ऍने हील,आरनॉल्ड पब्लिकेशन,२००३,पृष्ट-१५०-१५१.

[12] जनसंवाद सिध्दांत आणि व्यवहार ,रमा गोळवलकर,श्री मंगेश प्रकाशन,२००५,पान-५७

[13]   मॅकनायर बी,हिबर्ट एम,एण्ड श्लेन्सएन्जर पी, (२०००) पब्लिक ऍक्सेस ब्रॉडकास्टींग एण्ड डेमोक्रेटीक पार्टीसिपेशन इन द एज ऑफ मीडिएटेड डेमोक्रेसी,जर्नालिझम स्टडिज,३(३):पृष्ट-४०७-२७.

[14]  बातमीची सर्वसाधारण क्षेत्रे,अनंत येवलेकर व एकनाथ बागूल, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ प्रकाशन, २००४,पान १०.
[15]  जनसंवाद सिध्दांत आणि व्यवहार ,रमा गोळवलकर,श्री मंगेश प्रकाशन,२००५,पान- ६६

[16]  mÉëpÉÉMüU mÉÉkrÉå,प्रत्रकारितेची मुलतत्वे,मेहता पब्लिकेशन हाऊस,प्रकाशन-१९९५,पान-१५

[17] http://www.mediaknowall.com/gcseNews.html वापर- ११ जानेवारी २०११, मंगळवार, सळाळ-९ वाजता.
[18] वृत्तपत्राचे तत्वज्ञान, सुधाकर पवार, महाराष्ट्र विद्यार्थी ग्रंथनिर्मीती मंडळ नागपूर,१९९०,पान -

[19] मराठी वृत्तपत्राचा अभ्यास ,आर.के.लेले.कोन्टिंनेंटल प्रकाशन,१९८४,पा.क्र.

[20] मराठी विश्वकोश, खंड १७, पृष्ठ क्र. ९०, ९१


[21] हॅरीसन, जे(२०००)टेरेसट्रायल टी.व्ही. न्युज इन ब्रिटानियाः द कल्चर ऑफ प्रोडक्शन , मॅनचेस्टर,मॅनचेस्टर युनिव्हर्सिटी प्रेस.पृष्ट-५६-५७.
                                                                          

[22]   रेमण्ड कुहान,एरिक नेव्हु,पॉलिटीकल जर्नालिझमःन्यू चॅलेंजेस,न्यू प्रॅक्टीसेस, राउटलेज पब्लिकेश्न,२००७,पृष्ट-२९.

[23]   http://www.mediaknowall.com/gcseNews.html वापर-११ जानेवारी २०११,मंगळवार,सकाळ: ९ वा.
[24]   बातमीची सर्वसाधारण क्षेत्रे,अनंत येवलेकर व एकनाथ बागूल, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ प्रकाशन, २००४,पान १५-१७.

[25]http://censusindia.gov.in/Data_Products/Library/Indian_perceptive_link/Census_Terms_link/censusterms.html   वापर- १२ जानेवारी २०११, बुधवार, सकाळ- १० वा.    

[26]http://censusindia.gov.in/Data_Products/Library/Indian_perceptive_link/Census_Terms_link/censusterms.html   वापर- १२ जानेवारी २०११, बुधवार, सकाळ- १० वा.

[27]  फ्रॅंकीस स्मिथ वॅलेस(१९७५),अरबन डेव्हलपमेंट ;द प्रोसेस एण्ड प्रोब्लेम्स.युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया प्रेस,बर्क्ली एण्ड लॉस अन्जल्स,पृष्ट४-५.


[28]    http:// www.nationmaster.com/graph/mel_new_cir-media- वापर-(१२ जानेवारी २०११, बुधवार, वेळ-दुपार: ३ वाजता)
[29] http://marketing.about.com/od/marketingglossary/g/ciruclationdef.html  वापर- ११ जानेवारी २०११, मंगळवार, सळाळ-९ वाजता.



[30]   http://www.indiaclassifieds.com/printmedia_circulation.asp वापर - (१८ जानेवरी २०११मंगळवार )

[31]  पेट्रो,रिचर्ड.(१९८२).गेटकिपर एक्सरसाईज आर ईफेक्टीव,रिवलिंग,एसे टू कंस्ट्रक्ट.जर्नालिझम एज्युकेटर.खंड.३७(३)ःपृष्ट १०-४१.

[32] डेव्हीड मॅनींग.(१९६४)‘द गेटकिपर्स’: अ केस स्टडी इन द सिलेक्श्न ऑफ न्यूज,इनःलेवीस ए. डेक्सटर/डेव्हीड एम. व्हाईट (हर्स): पिपल,सोसाईटी एन्ड मास कम्युनिकेशन. लंडन एस.पृष्ट १६०-१७२.
                                                                                      
[33]  वृत्तपत्राचे तत्वज्ञान, सुधाकर पवार, महाराष्ट्र विद्यार्थी ग्रंथनिर्मीती मंडळ नागपूर,१९९०,पान ७.

[34] मेकींग लोकल न्यूज-बाय फिलीस केनीस,पब्लीश बाय युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो प्रेस , १९९७,पृष्ट-२ .
[36]  मास कम्युनिकेशन थेरी,डेनिस मॅक्वील,एस.ए.जी.ई. पब्लिकेशन.पृष्ट-१४८.

[37]  http://findarticles.com/P/articles/mi_200604/ai_n 19i97224  वापर- १६ जानेवारी २०११, रविवार,सकाळ: ११ वा.
[38] बेनेट,लान्स,न्यूज,द पब्लिक ऑफ इल्यूजन,लॉंगमन,२००३,आवृत्ती-५,पृष्ट-२.
[39] राजकीय समाजसास्त्रीय संशोधन, प्रा. गजेंद्रगड व्ही. एन. प्रतिभा प्रकाशन, डोंबिवली, प्र.आ.- ५ एप्रिल २०००, पृ.क्र- १३, १४.

[40] घाटोळे रा.ना, समाजशास्त्रीय संशोधन तत्त्व आणि पद्धती, नागपूर, पृष्ठ- ४०, वर्ष-२०००.

[41] घाटोळे रा.ना, समाजशास्त्रीय संशोधन तत्त्व आणि पद्धती, नागपूर, पृष्ठ- १२०, वर्ष-२०००.

[42] सुधीर महाजन,लोकमत:मुख्य संपादक,जळगाव आवृत्ती: दि: २०११डिसेंबर १५.बुधवार
[43] . प्रत्यक्ष घेतलेली मुलाखत, मदन बडगुजर (मुख्य संपादक रामप्रहर)आणि अभिजीत घोरपडे,उप संपादक लोकसत्ता,पनवेल, दि: २०११ जानेवारी: ३०. रविवार .
[44] प्रत्यक्ष घेतलेली मुलाखत,श्रीमंत माने,सकाळ:मुख्य संपादक,जळगाव आवृत्ती: दि: २०११डिसेंबर १४.मंगळवार.

[45] . प्रत्यक्ष घेतलेली मुलाखत, प्रसाद मोकाशी.(उप संपादक) लोकसत्ता: मुंबई: दि: २०११जानेवरी ३१.सोमवार .
[46]  प्रत्यक्ष घेतलेल्या मुलाखती.
[47] . तत्रैव ३८.

2 comments:

  1. you are invited to follow my blog

    ReplyDelete
  2. मला तुमचं नाव समजू शकेल का प्लीज ...

    ReplyDelete